पिंपरी-चिंचवड मधील भाजप नगरसेवक केशव घोळवे यांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेट्रोकडून महापालिकेला देण्यात आलेले गाळे मिळवून देत असल्याचे सांगत घोळवे यांनी व्यापाऱ्यांकडून खंडणी मागितली होती.
व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर घोळवे याला अटक करण्यात आली. घोळवे यांना अटक करण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मेट्रोकडून 100 गाळे बांधून महापालिकेला दिले जात आहेत. महापालिकेकडून देण्यात येणार हे गाळे मिळवून देत असल्याचे घोळवे यांनी व्यापाऱ्यांना सांगितले. या गाळ्यांसाठी व्यापाऱ्यांकडून केशळ घोळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात येत होती. सुरुवातीला अनेकांनी प्रत्येकी 50 हजार रुपये दिले होते. मात्र, घोळवेचे या रक्कमेत समाधान झाले नाही. त्यानंतर घोळवे यांनी पुन्हा प्रत्येकी एक लाखांची खंडणी मागितली. याबाबत पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. त्यातील एका फिर्यादीने 55 हजार रुपये दिले होते, पुढचे एक लाख न दिल्यास जीवे मारण्यात येईल असं ही धमकावण्यात आले होते. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी घोळवेसह त्याच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या.