धायरी येथील मनपाच्या वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे शाळा या शाळेतील इयत्ता आठवी नववी दहावीच्या वर्गाला शिक्षक मिळावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने आज अचानकपणे शाळेत जाऊन आंदोलन करण्यात आले.
वारंवार पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाला तक्रारी दाखल करून, निवेदने देऊन देखील कोणतीही दखल आजपर्यंत महापालिकेने घेतलेली नाही. पोकळे शाळेत जवळजवळ४०० मुलांचे भवितव्य शिक्षक व सेवक वर्ग यांच्या अभावी अंधारात आहे.
पोकळे शाळेमध्ये खाजगी संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी पर्यंत शाळा दहावीपर्यंत चालवली जात होती. त्या संस्थेचा शाळा चालवण्याचा अधिकार अचानक काढून घेतल्याने शाळेतील मुलांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे.आठवी, नववी व दहावीच्या मुलांना शिक्षक उपलब्ध नाही की सेवक वर्ग नाही. शाळेत प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.आठवीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अनेक अडचणी येत होत्या तसेच ज्या मुलांनी दहावी उत्तीर्ण झालेले आहेत अशा मुलांना दाखला नसल्याने व मार्कशीट अजूनही मिळाली नसल्याने अकरावीचा प्रवेश घेताना अडचणी येत आहे.
दाखला द्यायला शाळेत कोणीही शिक्षक अथवा मुख्याध्यापक उपलब्ध नसल्याने सर्वांचीच गैरसोय होऊ लागली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला वारंवार सांगून देखील दखल न घेतल्याने आज राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल पोकळे यांच्या माध्यमातून अचानकपणे पोकळे शाळेत आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी आठवी नववी दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रसेवा समूहाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तुषार कुंभार,राहुल जाधव, रणजीत जोरे,प्रसाद पोकळे,नवनाथ रायकर,स्मिता पोकळे, साई सांगळे, महेश पोकळे,निकेत दादा पोकळे, ज्योती कुंभार, सुजाता डोळस, रूपाली रायकर,अतुल पोकळे,स्वप्नील पातुरकर,संकेत जोरे,सागर जाधव आदी सहकारी उपस्थित होते..