जुन्नर : अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या शिवजन्मभूमी जुन्नर येथे शिवनेरी ट्रेकर्स संस्थेमार्फत येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी शिवनेरी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीला प्रदक्षिणा घालून जिजाऊ व शिवरायांना मानवंदना देणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी आहे. सहभागासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे.
शिवनेरीवरील शिवजयंती हा फक्त पुणे जिल्ह्याच्याच नाही तर अवघ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू आहे. दर वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने लाखो शिवप्रेमी शिवनेरीला भेट देतात. या ठिकाणाहून शिवरायांचा आचार, विचार व वारसा शिवज्योतीच्या माध्यमातून गावोगाव दौडत नेला जातो. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या निमित्ताने जिजाऊ व शिवरायांना मानवंदना देवून अबालवृद्धांमध्ये आरोग्यविषयक जागरुकता वाढविण्यासाठी शिवनेरी ट्रेकर्समार्फत या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते पोलिस वा सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणाऱ्या जवानांपर्यंत सर्वांना सहभागी होता येणार आहे. तीन व पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धा तर सहकुटुंब आनंददायी अनुभव देणाऱ्या ठरणार आहेत. सहभागी स्पर्धकांना मॅरेथॉनचे खास टी शर्ट, शर्यत पूर्ण केल्यानंतर पदक व शर्यत किती वेळात पूर्ण केली याची नोंद असलेले प्रमाणपत्र, चहा नाश्ता, स्पर्धा मार्गावर पाणी, फळे, प्रथमोपचार आदी पुरक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
- शिवनेरी किल्ल्याला प्रदक्षिणा
या मॅरेथॉनमधील 10 किमी गटातील स्पर्धक संपूर्ण शिवनेरी किल्ला परिसराला एक तर 21.1 किमी हाफ मॅरेथॉन गटातील धावपटू गडाला दोन प्रदक्षिणा घालणार आहेत. शिवनेरी किल्ल्याचे सर्वांगिण दर्शन या मार्गाने होते. याशिवाय हा मार्ग जुन्नरचे वैभव असलेल्या डोंगररांगा, लेणीसमुह, धरण, द्राक्ष व इतर पिकांची शेती, वनसंपदा आदी सर्वांना स्पर्शून जात असल्याने धावपटूंना एक आगळावेगळा रोमहर्षक अनुभव घेण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. तीन व पाच किलोमीटर गटांचा मार्ग शिवनेरीच्या पूर्व बाजूला समांतर असलेला मुख्य मार्ग आहे.
- मदतीसाठी स्वतंत्र कक्ष
खास या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरगावहून जुन्नरला येणाऱ्या शिवप्रेमींना कुठल्याही प्रकारची अडचण येवू नये वा गैरसोय होऊ नये यासाठी स्वतंत्र मदत कक्ष उघडण्यात येणार आहे. 15 जानेवारी पासून हा कक्ष सुरु होईल व तो 24 तास सुरु असेल. जुन्नर व परिसरातील विविध प्रकारची निवास व्यवस्था, पर्यटन केंद्र, खाद्यसंस्कृती, प्रवास व्यवस्था याबाबत धावपटूंना माहिती देण्याचे वा त्यांची संबंधित ठिकाणांशी जोडणी करुन देण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येईल, अशी माहिती शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष निलेश खोकराळे यांनी दिली.
- सहभागी संस्था, संघटना
या मॅरेथॉनच्या आयोजनात विविध सेवाभावी संस्था, संघटनांचा समावेश आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी विकासासाठी कार्यरत असलेली चाईल्ड फंड इंडिया, शिवाई देवी देवस्थान ट्रस्ट, कुसूर, पाडळी बारव व सोमतवाडी ग्रामपंचायत, पीसीएमसी रनर्स, शिवनेरी कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान, डॉ. के.एस. खराडे फाऊंडेशन, साई श्रद्धा मेडिकल फाऊंडेशन, चला मारु फेरफटका समुह, सह्याद्री वाईल्डलाईफ, सायकल रिपब्लिक, पी.एन.सेफ्टी इंडस्ट्रीज, शेकरु आऊटडोअर्स, बोरी बु. पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन समिती यांचा यात समावेश आहे. तर वन विभाग, तहसीलदार कार्यालय, पोलिस दल, पंचायत समिती, जुन्नर नगरपरिषद यांचेही विशेष सहकार्य लाभत आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. इच्छुकांना सहभागी होण्यासाठी https://www.townscript.com/e/shivneri-marathon-232343 या लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : 9881143180, 9011583475