सातारा:- भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या 15 व्या जनआवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने आज करण्यात आले.
शाहू स्टेडियममधील जिल्हा क्रीडा संकुलातील सभागृहात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे, सातारा तालीम संघाचे सुधीर पवार, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, कुस्ती परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, लेखक संजय दुधाणे यांच्या हस्ते या जनाआवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
खाशाबांचा वारसदार अजून महाराष्ट्रात झाला नाही ही खंत व्यक्त करून खाशाबांना पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे असे बाळासाहेब लांडगे यांनी प्रकाशन प्रसंगी सांगितले.
1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कराडच्या खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात देशासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकले होते. त्याच्या ही ऐतिहासिक यशोगाथा 2000 मध्ये क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी सर्वप्रथम लोकांसमोर आणली. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळाल्याने हे पुस्तक केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टनेही प्रकाशित केले आहे. मराठीसह हिंदीमध्येही हे पुस्तक उपलब्ध आहे.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा शाहू महाराज पुरस्काराने गौरवित झाले असून इयत्ता 9वी नंतर आता इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकातही या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मुंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट करण्याचा करार केला असून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकावरच या चित्रपटाची मूळ कथा असणार आहे.
क्रीडालेखक संजय दुधाणे यांची आतापर्यंत 19 पुस्तक प्रकाशित झाली असून सातार्याचे ऑलिम्पिकपटू श्रीरंग जाधव यांचे चरित्र लेखनही दुधाणे यांनी केले आहे. ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, संत सीतामाई, संत गणोरेबाबा, मेजर ध्यानचंद, भारतरत्न सचिन तेंडुलकर, फ्लाईंग शीख मिल्खासिंग, सुपर मॉम मेरी कोम, गोल्डन बॉय नीरज ही चरित्रे आणि आशियाई स्पर्धा, वाटचाल ऑलिम्पिकची, क्रीडापर्वणी, कथा ऑलिम्पिकच्या, ऑलिम्पिक अमृतानुभव, खेळांचा राजा-फुटबॉल, भारताचे ऑलिम्पिक, भारतीय खेळ, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी ही क्रीडाविषयक पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.
दुधाणे यांनी टोकियो ऑलिम्पिक 2021, रिओ ऑलिम्पिक 2016,लंडन ऑलिम्पिक 2012, आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच जागतिक हॉकी स्पर्धा, इंग्लडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे थेट वृत्तांकन केले आहे. लंडन ऑलिम्पिक येशाचा षटकार अनुभवणारे एकमेव मराठी क्रीडापत्रकार आहेत.
सातारा येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्ताने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांच्या चरित्राच्या 15 व्या जनआवृत्तीचे प्रकाशित होत आहे. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा यांनी या पुस्तकासाठी सहकार्य आहे.